परळी(प्रतिनिधी) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या देशातील उपेक्षित आणि शोषितांच्या आवाजाला आपल्या साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडली. त्यामुळे देशातच नाही तर विदेशात सुध्दा त्यांची दखल घेतली गेली. असे प्रतिपादन विचारवंत लक्ष्मण वैराळ यांनी केले. ते परळी येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. लोकशाहीचे दोन शत्रू एक हुकूमशाही आणि दुसरी माणसा-माणसात भेद मानणारी नीती.
हुकूमशाही प्रेरणा ही मुळातच अबाधित स्वरूपाची नाही. ती प्रेरणा काढून घेतली की ती संघटन गडगडते. 1991 मध्ये रशियाचे 15 स्वतंत्र देशात विभाजन झाले. साम्यवादी राजवट कोसळली. रोहित वेमुलांनी सन 2015 ला थेट सिताराम येचुरींना विचारले होते की, ‘पॉलिट ब्युरो मध्ये अनुसूचित जातीचा अजून एकही सदस्य घेतलेला नाही. 51 वर्षा मध्ये महिला, अल्पसंख्या, दलित सेल वेगवेगळे सेल का ?’ कम्युनिस्ट समता सांगतात पण समता सुद्धा नाही.तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न द्यावा अशी मागणी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक व पत्रकार रानबा गायकवाड यांनी केली.
शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी स्टुडन्ट फॉर रिकंट्रक्शन ऑफ सोसायटी व फुले आंबेडकर अभ्यास समूह तसेच परळी पत्रकार संघ यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती साजरी करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कम्युनिष्ठापासून दूर का गेले?, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शोषण मुक्तीची चळवळ पुनर्जीवित करण्यासाठी काय करावे लागेल?, डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित ‘बुद्ध कि कार्ल मार्क्स’ या विषयावर प्रबोधनपर चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विचारमंचावर परळी औष्णिक विद्युत केंद्राचे उपकार्यकारी अभियंता एस. एल. होटकर, गणित्तज्ञ सोपानराव निलावाड , ज्ञानोबा मस्के, अतिरिक्त कार्यकारी अभियंता निखिल मेश्राम,ज्येष्ठ नेते उत्तमराव माने, उपकार्यकारी अभियंता श्रीकांत इंगळे उपस्थित होते.
पुढे बोलतांना लक्ष्मण वैराळ म्हणाले की, अण्णाभाऊ साठे हे 1955 नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांकडे वळले.त्यांनी लिहिलेल्या अनेक कथांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडल्याचे दिसून येते. ‘फकीरा’ कादंबरी त्यांनी बाबासाहेबांना अर्पण केली. अण्णाभाऊंच्या साहित्यावर आधारित साहित्य संमेलनाचे पूर्वनियोजित अध्यक्ष बाबासाहेबांना केले होते.कामगारांसाठी पिण्याच्या पाणी वेगवेगळे होते. जाती व्यवस्था हे फक्त श्रमविभाजन नाही ते श्रमिकांचीही विभाजन आहे.आयुष्याच्या शेवटी कम्युनिस्टांनी त्यांना एक प्रकारे छळल्याचेही उदाहरणे त्यांनी दिली. श्रीपाद अमृत डांगे, गव्हाणकर आदींच्या षडयंत्राचे त्यांनी दाखले दिले. आपले बुद्धीजीवी लोक कम्युनिजामला लाथाडून फुले-आंबेडकरवादी भूमिका आणि विचारधारा स्वीकार करीत आहेत.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘ॲन्हिलेशन ऑफ कास्ट’ अर्थात जातीव्यवस्थेचे निर्मूलन पुस्तक भेट देण्यात आले. या प्रसंगी पत्रकार धनंजय अरबुने ,संपादक नितीन ढाकणे,आकाश देवरे ,सम्राट गित्ते, दशरथ रोडे, प्रशांत कदम,संपादक अभिमान मस्के, परसेवाड सर, दिपक गायकवाड, बंकटी उपाडे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन फुले – आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे यांनी तर आभार पत्रकार जगदीश शिंदे यांनी मानले.