परभणी,दि.26(प्रतिनिधी) : सत्ता अबाधित राखण्याकरीता आंधद्रप्रदेश आणि बिहार या दोन राज्यांना भरघोस अशी, आर्थिक मदत करतेवेळी केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्यास काहीही दिले नाही, केंद्र सरकारचे हे दुजाभावाचे धोरण घातक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंतांच्या संवाद दौर्यानिमित्त आमदार पाटील हे शुक्रवारी परभणी जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेतून पाटील यांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका टिप्पणी केली. लोकसभे प्रमाणे विधानसभा निवडणूकीतसुध्दा सत्तारुढ महायुतीस सर्वसामान्य नागरिक निश्चितपणे जागा दाखवून देतील, असा विश्वास व्यक्त करतेवेळी राज्य व केंद्र सरकारने प्रत्येक निवडणूकीत सर्वसामान्य नागरीकांना भरघोस आश्वासने दिली. त्याद्वारे सामान्यांची दिशाभूल केली. त्या घोषणांची योजनांची अंमलबजावनी झालीच नाही. कारण सरकारी तिजोरीत योजनांच्या अंमलबजावनीसाठी पैसाच नाही, असे ते म्हणाले.
या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारद्वारे योजनांना, विकास कामांना समाधानकारक निधी मिळेल, असे अपेक्षित होते. दुर्देवाने केंद्र सरकारने केवळ सत्ता अबाधित राखण्याकरीता आंध्र आणि बिहार या दोन राज्यांना भरघोस मदत करतेवेळी महाराष्ट्राच्या पदरात फारसे काही टाकले नाही, असे ते म्हणाले.
राज्यात रस्ते, महामार्ग मेट्रो सारख्या योजनांवर प्रचंड उधळपट्टी करतेवेळी सरकारने सामान्यांना टोलच्या रुपातून जेरीस आणण्याचे प्रकार सुरु केल्याबद्दल पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने निवडणूकीपूर्वी निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी आमदार सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अॅड.विजय गव्हाणे, माजी आमदार विजय भांबळे, तहेसीन अहेमद खान, रविराज देशमुख, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, रविराज देशमुख, अजय गव्हाणे, रमाकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.