परभणी,दि.27(लक्ष्मण उजगरे) : सात विहीरींचे वर्क ऑर्डर मंजूर करण्याकरीता सुमारे 35 हजार रुपयांची लाच मागणीसह स्विकारणार्या पाथरी पंचायत समितीतील गटविकास अधिकारी ईश्वर बाळू पवार व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गोवर्धन मधुकर बडे या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने गुरुवारी (दि.27) मोठ्य शिताफीने ताब्यात घेतले.
पाथरी पंचायत समिती अतंर्गत झरी ग्रामपंचायतीतील एका ग्रामस्थाने सात विहिरींचे वर्क ऑर्डर मिळण्याकरीता प्रस्ताव दाखल केले होते. ते वर्क ऑर्डर मंजूर करण्याकरीता एका विहिरीचे पाच हजार रुपये या प्रमाणे 35 हजार रुपये लाच द्यावी लागेल, असे गटविकास अधिकारी ईश्वर बाळू पवार यांनी संबंधित ग्रामस्थास सूनावले. त्यामुळे त्या ग्रामस्थाने 27 फेबु्रवारी रोजी परभणीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या खात्याकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे या खात्याने पडताळणी केली असता ईश्वर पवार याने तक्रारकर्ता यांच्याकडे त्याने दाखल केलेल्या सात विहीरीच्या वर्क ऑर्डर करीता एका विहरीचे 5 हजार रुपये या प्रमाणे 35 हजार रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष करुन लाचेची रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शविली. त्या आधारे या खात्याने एक पथक तयार करीत सापळा रचला. तक्रारकर्ते हे लाचेची रक्कम देण्यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात पंचासह गेले असता सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गोवर्धन बडे याने या तक्रारकर्त्यास बीडीओ साहेबांनी पैसे माझ्याकडे देण्यास सांगितले आहे, असे नमूद करीत बडे याने पंचासमक्ष तक्रारकर्त्याकडून 35 हजार रुपये हे बीडीओ पवार यांच्या सांगण्यावरुन स्वतः स्विकारले. त्यावेळी पथकाने त्यास तातडीने ताब्यात घेतले. या पथकाने बडे यांची अंग झडती घेतली व त्यातून 35 हजार रुपये लाचेची रक्कम व अन्य 8 हजार रुपये जप्त केले. तर बीडीओ पवार यांच्या झडतीतून रोख 6 हजार रुपये ताब्यात घेतले. दरम्यान, या पथकाने आरोपी ईश्वर पवार व गोवर्धन बडे यांच्या पाथरीतील शासकीय वसाहतीतील निवास्थानांची झडती घेतली असता पवार यांच्या निवासस्थानातून 63 हजार रुपये रोख मिळाले. दरम्यान, या प्रकरणाबाबत पाथरी पोलिस ठाण्यात त्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पथकाने दोघांचेही मोबाईल जप्त केले.
पोलिस अधिक्षक संदीप पालवे, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संजय तुंगारे, पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अल्ताफ मुलानी यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलिस निरीक्षक बसवेश्वर जक्कीकोरे, निलपत्रेवार, रविंद्र भूमकर, सीमा चाटे, नामदेव आदमे, अतूल कदम, कल्याण नागरगोजे, शाम बोधणकर, जे.जे. कदम, नरवाडे आदी यात सहभागी होते.