कुस्तीपटू विनेश फोगाट अवघ्या नऊ वर्षांची असताना वडिलांची जमीनीच्या वादातून हत्या झाली . अगदी बालवयापासून संघर्ष करावा लागलेल्या मुलीला पुढे देशाची मान उंचावली तरी संघर्षच करावा लागला.पण या संघर्षातून एखाद्या फिनिक्स पक्षाने झेप घ्यावी तशी तिने झेप घेतली. यशाला सारखी गवसणी घातली आणि ती कुटुंबाची लेक नाही तर अख्खा देशाची लेक बनली. विनेशचा जन्म २५ ऑगस्ट १९९४ रोजी बलाली हरियाणा, भारतातील चरखी दादरी येथे झाला. ती राजपाल फोगाटची मुलगी आहे आणि कुस्तीपटूंच्या कुटुंबातील . कुस्ती खेळणाऱ्या फोगाट बहिणींपैकी ती एक.तिची बहीण प्रियंका फोगाट आणि चुलत बहिणी गीता फोगाट , रितू फोगाट आणि बबिता कुमारी या सर्व कुस्तीपटू आहेत. विनेशला तिचे काका महावीर सिंग फोगाट यांनी प्रशिक्षण दिले .
तिने २०१८ साली इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.२०२० मध्ये तिला भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.२०१३ साली भारतातील नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत विनेशने ५२ कि.ग्रॅ. गटात कांस्य पदक जिंकले.त्याच वर्षी २०१३ साली दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत विनेशने ५१ कि.ग्रॅ . वजनी गटात रजत पदक जिंकले. २०१४ साली ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ४८ कि.ग्रॅ गटात विनेशने सुवर्णपदक जिंकले. २०१४ साली इंचेऑन, दक्षिण कोरिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४८ कि.ग्रॅ गटात विनेशने कांस्यपदक जिंकले.२०१५ साली दोहा, कतार येथे झालेल्या आशियाई अजिंक्य स्पर्धेत विनेशने रौप्य पदक .इस्तंबूल येथे २०१६ रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी झालेल्या पात्रता स्पर्धेत तिने अंतिम फेरी जिंकून ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग निश्चित केला.२०१६ साली रीओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत विनेशकडून पदकाची अपेक्षा केली जात होती. मात्र चीनच्या सन यानान बरोबर झालेल्या उपांत्यपूर्व लढतीच्या वेळी गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तिला सामना सोडून द्यावा लागला.२०१८ साली गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विनेशने ४८ कि.ग्रॅ. गटात विनेशने सुवर्णपदक जिंकले. २०१८ साली इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेशने सुवर्णपदक जिंकले आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ठरली. ह्या सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पाहिल्यावर आणि विनेश यांचे सतत मिळाणारे यश ही भारतीयांसाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब.ती आता देशाचा अभिमान झाली होती आणि अशा व्यक्तीचा किंबहुना भारतीय महिला कुस्तीपटूंशी खुद्द भारतीय कुस्ती महासंघाच्या तत्कालीन अध्यक्षाने काही गैरवर्तन करणे म्हणजे भारताच्या अभिमानाशी छेडछाड करण्यासारखे. महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षावर लैंगिक छळाचा आरोप केला आणि दिल्लीत जंतर मंतर मैदानावर आंदोलन केले याचे नेतृत्व विनेश फोगाटने केले आणि देशाचा अभिमान झालेल्या विनेशला आंदोलन स्थळावरून पोलिसांनी फरफटत नेले.तिची त्यावेळी मानसिकता काय झाली असेल याचा कुणी विचार केलाय? जागतिक पटलावर महिला कुस्तीला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी जिच्यामुळे अनेक तरुणींना कुस्ती प्रकारात करिअर करता येते याची कल्पना आली.
महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराची तक्रार ही देशासाठी अत्यंत निंदनीय.पुन्हा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आंदोलन करावे लागणे यावरून सरकारची मानसिकता लक्षात येते.भाजपाचे ब्रिजभूषण शरण सिंग हे कुस्ती महासंघाचे तत्कालीन प्रमुख होते. त्यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करीत मोठे आंदोलन केले होते. विनेश या आंदोलनाचा प्रमुख चेहरा होती. तिला अद्यापही न्याय मिळालेला नाही. देशाची शान बनलेल्या विनेशला एवढे त्याच देशातील सरकार, प्रशासनाने छळले असताना तीची मानसिकता काय झाली असेल याची नुसती कल्पना केली तरी आपण कोलमडून जाऊ पण तीने मानसिकता खचू दिली नाही आणि ती पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात देशाची कुस्तीत मान उंचावण्यासाठी पाय रोवून उभी राहिली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तीने जगज्जेत्या कुस्तीपटूला चितपट केले.मात्र, अंतिम फेरीत तिच्या वजनाचे कारण ठरले आणि ती अंतिम लढत लढण्यास बाद झाली.प्रयत्न करूनही विनेशचे वजन १०० ग्रॅमपेक्षा जास्त झाले. विनेश फोगाट ही ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी लढणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरणार होती. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत सुवर्णपदकाच्या लढतीत २९ वर्षीय युएसएच्या सारा हिल्डब्रँडशी तिची झुंज होती . मात्र तिचे वजन कारणीभूत ठरले.यूएसएच्या सारा हिल्डब्रँडने महिलांच्या फ्रीस्टाइल ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत सुवर्ण जिंकले. अन्यथा हे सुवर्ण पदक भारताच्या विनेशने खेचले असते एवढा दृढ विश्वास आपल्याला होता.पण तिचा संघर्ष कायम कुस्तीशी, जिवनाशी आणि सिस्टीमशी राहिला.तिच्या या देदीप्यमान यशातील संघर्षाची झुंज सुवर्णाक्षरात लिहिली जाईल!एवढे मात्र नक्की.
– पदमाकर उखळीकर ,
मो.९९७५१८८९१२ .