परभणी(लक्ष्मण उजगरे)डीपीवर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून देण्यासाठी ३ हजाराची लाच घेताना महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.११) दुपारच्या सुमारास सिमुरगव्हाण फाटा येथील मोहिनी टी हाऊस येथे करण्यात आली. ज्ञानोबा नारायणराव पितळे (वय ४२) असे लाच घेणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ज्ञानोबा पितळे यांनी तक्रारदाराकडून झरी कॅनालजवळील शेतातील वीज मोटारीसाठीच्या तळेकर डीपीवर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून देण्यासाठी ३ हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराला ती लाच देणे शक्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी (दि.१०) तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.११) पडताळणी केली असता पितळे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. त्यानुसार ३ हजाराची लाच स्विकारताना पंचासमक्ष लाचलुचपतने पितळे यांना पंचासमक्ष रंगेहाथ अटक केली. ही कारवाई ‘एसीबी’नांदेडचे पोलिस अधिक्षक संदीप पालवे, परभणीचे उप अधिक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनात व परभणीचे निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे यांच्या नेतृत्वात निरीक्षक अल्ताफ मुलाणी, अंमलदार शेख जिब्राईल, कल्याण नागरगोजे, नामदेव आदमे, चापोह जे.जे.कदम, नरवाडे यांनी केली.