धनगर समाज गरीब असल्याने या समाजाला एस. टी.प्रवर्गाचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्यासंदर्भात ठोस प्रक्रिया राबवावी यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक लावण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी परभणीत केले.
जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरकडील वंशज तथा विधान परिषदेचे नवनिर्वाचित सभापती प्रा.राम शिंदे व जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा शनिवारी (दि.15) परभणीमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर होते. व्यासपीठावर पालकमंत्री मेघना बोर्डीकर, गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुुट्टे, आयोजक तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भुमरे, आनंद भरोसे, रामकिशन रौंदळे, मारोती बनसोडे, हरिभाऊ शेळके, अनंत बनसोडे, प्रभाकर वजीर, राजेश बालटकर, नारायणराव पिसाळ, कृष्णा दळणर, माधवराव किल्लेधारूरकर आदींची उपस्थिती होती.
आपल्या भाषणात प्रा.शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष सुरू असून त्यांच्या कार्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते असे सांगितले. सर्वसामान्य व्यक्तीला विकासाचा केंद्रबिंदू मानून त्यांनी उत्कृष्ट राज्यकारभार चालवला. 12 हजार 600 मंदिरे बांधले, जिर्णोध्दारही केला, असेही ते म्हणाले. त्यांचे कार्य असामान्य व आदर्श असून त्यांची प्रेरणा घेऊन सर्वांनी काम करावे यासाठी परभणीत पालकमंत्री बोर्डीकर यांच्या पुढाकाराने अहिल्यादेवींचे स्मारक व पुतळा उभारण्यात येणार आहे, ही आनंदाची बाब असल्याचे प्रा.शिंदे यांनी सांगितले.
धनगर समाजाच्या मतदानामुळेच महायुतीला जिल्ह्यात यश मिळाल्याची कबुली ज्येष्ठ नेते बोर्डीकर यांनी भाषणात दिलेली आहे. परभणीकरांनी दाखवलेले हे एकीचे बळ आहे. एवढ्या मोठ्या संख्येने समाज महायुतीच्या पाठीशी उभा राहिला, त्याची जाणीव ठेवून सरकारनेही धनगर समाजाचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविले पाहिजेत. तसेच समाजानेही स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून आगामी निवडणुकांमध्येही साथ दिली पाहिजे. यावेळी आ.गुट्टे, माजी आ.बोर्डीकर आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक सुरेश भुमरे तर सुत्रसंचालन सुनिल तुरूकमाने यांनी केले.
परभणीत अहिल्यादेवींचे स्मारक उभारणार- पालकमंत्री
परभणीला 12 वर्षांनंतर पालकमंत्रीपद मिळाल्याने माझ्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा पुर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहे. पक्ष नेतृत्वाने दिलेल्या संधीचे सोने करेन असे सांगत परभणी शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळाच नाही तर स्मारक उभारण्याचे आश्वासन पालकमंत्री बोर्डीकर यांनी यावेळी दिले. अहिल्यादेवींंनी सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कार्य केल्याचे त्या म्हणाल्या.