परळी (प्रतिनिधी)परळी तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी असलेला बौद्ध समाजाचा सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी अरविंद राजेभाऊ खोपे यांची लातूर येथे स्वामी विवेकानंद विद्यालयातील निवासी वस्तीगृहात हत्या झाल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी दोन जातीयवादी शिक्षकांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट सह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या शाळेचे संस्थाचालक व प्राचार्य यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पांगरी, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथील अरविंद राजेभाऊ खोपे वय १३ वर्षे हा बौद्ध समाजाचा विद्यार्थी लातूर येथील एमआयडीसी विभागात असणाऱ्या स्वामी विवेकानंद विद्यालयातील राजमाता जिजाऊ निवासी वस्तीगृहात इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत होता. त्याची दिनांक 30 जुलै रोजी हत्या झाल्याचे पालकांच्या लक्षात आले. या घटनेने संपूर्ण लातूर जिल्हा तसेच महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. तसेच लातूर जिल्ह्यातील आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या.
याप्रकरणी एमआयडीसी लातूर पोलिसांनी राजमाता जिजाऊ होस्टेलमधील विनायक गोविंद टेकाळे व विठ्ठल श्रीधर सूर्यवंशी यांच्यावर कलम 106 (1) 238, 3(5) तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा 1989 नुसार कलम 3(1)(5) व 3(2) (v) अन्वे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मयत अरविंद खोपे याचे लातूर येथे राहणारे काका सहदेव गणपती तरकसे वय 45 यांनी एमआयडीसी पोलिसांना पुरवणी जवाब दिला असून यामध्ये संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, प्राचार्य गोविंद शिंदे बिराजदार सर व दिनांक 29 आणि 30 जुलै रोजी रात्री ड्युटीवर असणाऱ्या सुरक्षारक्षकावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग लातूर शहर हे करीत आहेत. या घटनेने लातूर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच संपूर्ण आंबेडकरी समाजातून संतापाच्या तीव्र भावना उमटत आहेत.