रानबा गायकवाड (राजकारण विषेश) महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता केव्हांही लागू शकते आणि ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुका पार पडू शकतात. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात दरी निर्माण झाली असून त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात अनुसूचित जाती व जमाती आणि मुस्लिमांची मते निर्णयाक ठरणार आहेत.
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलन होत आहे .मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तसेच राज्यात विविध जिल्यातून झालेली रस्ता रोको, धरणे आंदोलने, बंद तसेच मुंबईत मंत्रालयाकडे निघालेल्या लॉंग मार्च यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे हे मनोज जरांगे यांची महत्त्वाची मागणी आहे. तर या मागणीला विरोध करण्याचे काम महाराष्ट्राचे मंत्रिमंडळातील छगन भुजबळ, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे,प्रा.टी.पी.मुंडे आदि नेत्यांनी केले आहे.
मराठा समाजाच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी ओबीसी समाजाने ओबीसी बचाव परिषदा आयोजित केल्या.तर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांना काउंटर करण्यासाठी त्यांनीही उपोषण सुरू केले. याचा परिणाम राज्यातील प्रत्येक जिल्हा ,तालुका, आणि गाव पातळीपर्यंत दिसून येत आहे. आगामी निवडणुकीत मराठा समाज आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवण्याची भाषा बोलत आहे तर ओबीसी नेते ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण घेऊ देणार नाहीत अशा प्रकारच्या भूमिकेत आहेत.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या परिस्थितीमध्ये जर विधानसभेच्या निवडणुका लागल्या तर निश्चितच मागासवर्गीय समाज आणि मुस्लिम समाजाच्या मताला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. या दोन समाजाची मते ज्या पक्षाच्या बाजूला झुकतील त्या पक्षाचे उमेदवार विजयी होतील असे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे निवडणुका घोषित झाल्या तर राज्यातील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे ,वंचित बहुजन आघाडी आदी विविध पक्ष या दोन समाजाच्या मतदारांची मते मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील यात तिळमात्र शंका नाही. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अथवा महायुतीला बहुमत मिळाले तर अनुसूचित जाती, जमाती तसेच मुस्लिम समाजाला सत्तेत वाटा मिळेल का हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.