सावित्रीबाई फुले या मराठी कवयित्री, समाजसुधारक आणि शिक्षिका होत्या. त्यांनी व त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी महिला हक्क आणि शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. मुलींच्या शाळेत सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्या आजच्या जगातील मराठी महाकाव्याची अग्रदूत कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, कवयित्री , समाजसुधारक ,भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करणार्या शिक्षणतज्ञ,लेखिका, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी जन्मदिन खऱ्या अर्थानं तमाम महिलांचा जन्मदिन म्हणावा.बहुजनांना शिक्षणाची प्रथम कवाड उघडली असतील तर या फुले दांपत्यानी. सावित्रीबाई फुले या स्वतः शिक्षित झाल्या आणि त्यांनतर त्यांनी बहुजन समाजातील गोर-गरीब मुलांना शिकवण्यासाठी विडा उचलला. ही बाब आताच्या स्री शिक्षिकांसारखी सोपी नव्हती. बहुजन समाजातील मुलांना शिकवणं म्हणजे अंगावर शेण,गोटे झेलणं आणि ते झेलून सावित्रीबाई फुले यांनी सनातन्यांच्या तोंडून निघणाऱ्या शिव्या शाप झेलून शिकवलं . स्त्रियांना शिक्षित करणे हे पाप आहे असे त्यांना वाटत असल्याने सावित्रीबाईंना उच्चवर्णीयांकडून खूप विरोध झाला. शाळेत ये-जा करताना तिच्यावर दगड, माती आणि शेण फेकण्यात आले. यामुळे ज्योतिराव फुले यांच्या वडिलांना त्यांना शाळा बंद करण्यास किंवा घर सोडण्यास सांगावे लागले.१८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर ज्योतिबा फुले यांचे वय तेरा वर्षांचे होते.ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या मैत्रिणी आणि सहकारी फातिमा शेख यांना भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता.
कालची ‘ अबला ‘ म्हणून गणली गेलेली स्री ‘ सबला ‘ झाली आहे.यामागच कारण शिक्षण आहे.शिक्षणाशिवाय सबला होणं अशक्य आहे. कोणत्याही क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहेत.हे सहजासहजी घडलेलं परिवर्तन नाही. यासाठी, कित्येक समाजसुधारकांना चटके सोसावे लागले असतील.अविरत संघर्ष करावा लागला असेल.आपण तर चटके सोसण्याची आणि संघर्षाची परिभाषाचं विसरत चाललोय.परिवर्तन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.पण, किती हात परिवर्तनासाठी आणि समाजसुधारणा करण्यासाठी पुढे येतात.हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई फुले ह्या समाजकार्यात पुढे असतं. आज त्यांच्यामुळे महिला पुढारलेली आहे.परंतु, सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शाची तिच्यांत कमतरता दिसते आहे.
अनेक संघर्षाला तोंड देत सावित्रीबाईंचा शिकविकविण्याचा हा उपक्रम चालूच होता. त्या शिकविण्यासाठी जात असताना आपल्याबरोबर पिशवीत साडी घेऊन जात असत आणि शाळेत गेल्यानंतर सनातनी, धर्ममार्तंडांनी टाकलेली घाण साफ करून, त्या ती पिशवीतील साडी घालत.एवढी अवहेलना करूनही सावित्रीबाईंना याचा तसूभरही फरक पडत नसे.या विरोधाला न जुमानता त्यांनी बुहजनांना शिक्षण देण्याचा निवडलेला मार्ग सुकर नव्हता. परंतु , त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या हक्कांसाठी आयुष्य खर्ची घातले.महिलां चुल आणि मुल या मर्यादेपर्यंत राहता कामा नये म्हणून त्यांनी मुलींना शिक्षित बनवण्यासाठी , १ जानेवारी, १८४८ साली सावित्रीबाई फुले आणि म.ज्योतिबा फुले यांच्या सह विविध जातीच्या नऊ मुलीना घेऊन , पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली.यावरून ,त्यांची दूरदृष्टी लक्षात येते. आज सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मुली आणि चुली हे समीकरण बदलून गेलंय.ते केवळ सावित्रीबाई फुले यांनी अंगावर झेललेल्या शेणा, दगडाचा मार झेलल्यामुळे!
समाजात बालविवाह प्रथा होती. या प्रथेमुळे तरुण महिला लहान वयातच मोठ्या संख्येने विधवा होत असत. त्याकाळी समाजात विधवा पुनर्विवाह विवाह करण्यास मनाई होती. महिलांना अपमानास्पद जगणे सहन करावे लागायचे. महिलांवर अत्याचार , छळ आणि बलत्कारही होत असे. बलात्कारामुळे गर्भवती झाल्यामुळे समाजात इज्जत मिळायची नाही . तसेच , सामाजिक भीतीपोटी महिलांचे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत. स्त्रियांवर होणारा अन्याय सावित्रीबाई फुले यांना सहन होऊ शकला नाही . त्यांनी २८ जानेवारी १८५३ रोजी गर्भवती महिलांसाठी निवारा व संरक्षणासाठी ज्योतिबाचा मित्र उस्मान शेख यांच्या घरी ‘ बाल हत्या प्रतिबंधक गृह ‘ ची स्थापन केली आणि पाळणाघरही सुरू केले.विधवा महिलांचे केशवपन केले जात असे.सावित्रीबाईंनी याविरोधात आंदोलन केले. महिलाविरोधी आणि रुढी परंपरेचा आवाज उठविला आणि महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी त्या सतत म. ज्योतिबा फुलेंच्या साथीने संघर्ष करीत राहिल्या . सावित्रीबाई फुलेंना इतिहासातील प्रखर समाजसुधारक, महिला शिक्षणाच्या पुरस्कर्त्या म्हणणे संयुक्तिक ठरेल!
– पदमाकर उखळीकर,मो.९६३७६७९५४२(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)