Saturday, April 5, 2025

रानबा गायकवाड लोककवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

Spread the love

परभणी (प्रतिनिधी)जेष्ठ पत्रकार व साहित्यिक भीमयुगकार रानबा गायकवाड यांना पत्रकारितेच्या आणि साहित्याच्या माध्यमातून आंबेडकरी विचारधारा जनमाणसात रुजविण्याचे कार्य केल्याबद्दल महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्काराने आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी परभणी येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

    परभणी येथील बी. रघुनाथ सभागृहात महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त अभिरा फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक मिलिंद सावंत हे होते .तर कार्यक्रमाचे उद्घाटन संजीवनी मित्र मंडळाचे अध्यक्ष आनंद भरोसे यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचारवंत प्रा.डॉ. भीमराव खाडे, प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजेश देशमुख,हभप प्रकाश महाराज साखरे,समाजभूषण संजय भाऊ कांबळे, कॉम्रेड किर्तीकुमार बुरांडे,डॉ धुतमल,यशवंत मकरंद,डॉ. सुनील तुरुकमाने,पंकज खेडकर, रामदास दळवे, विठ्ठलराव पारधे,किरण मानवतकर,प्रमोद साळवे,करण गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

    अभिरा फाउंडेशनचे प्रमुख भन्ते मुदितानंद महाथेरो यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सोहळा मागील सोळा वर्षांपासून सुरु आहे.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचविण्याचे महान कार्य करणारे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रतीवर्षी अभिरा फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार आंबेडकर चळवळीतील व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. 

     2024 साठीचा जीवनगौरव पुरस्कार रानबा गायकवाड यांच्यासह डी. आर. तुपसुंदर, आंबेडकर गीतांच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या मुंबई येथील गायिका चंद्रकला गायकवाड, शाहीर नामदेव लहाडे यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक तथा विचारवंत रानबा गायकवाड यांना यापूर्वी मूकनायक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार’ , शांताबाई शेळके राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, फिल्म डिव्हिजन ऑफ इंडियाचा पुरस्कार , विद्रोही कवी नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार ,गोवा फिल्म फेस्टिवलचा बेस्ट स्टोरी रायटर अवॉर्ड, कलिंगा फिल्म फेस्टिव्हल बेस्ट स्क्रीनप्ले अवॉर्ड,पत्रकारिता क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार, परळी भूषण पुरस्कार , बीड जिल्हा ग्रंथालय संघाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथ लेखक पुरस्कार असे 50 पेक्षा अधिक पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत.

     पत्रकारितेच्या क्षेत्रात पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळापासून रानबा गायकवाड कार्यरत आहेत. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र दैनिक सम्राटचे तालुका प्रतिनिधी, साप्ताहिक शिक्षण मार्ग,दै. परळी बुलेटिनचे संपादक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी पाच पुस्तके, पाच नाटके, पाचपेक्षा अधिक लघुपट,कथा, कवितांचे लेखन केले आहे.त्यांचे सर्जनशील दिग्दर्शक डॉ. सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित ‘भीमयुग’ हे क्रांतीकारी आंबेडकरवादी नाटक खूप गाजले आहे.आंबेडकरी चळवळीतील अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.पत्रकारिता, सामाजिक कार्य, साहित्य,सिने व नाट्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले.

        या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक नाटककार प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ तायडे, मुक्ता शिक्षक संघटनेचे नेते सुभाष सवयी,प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत अजय कुमार गंडले ,पत्रकार विकास वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव झीलमेवाड, पाथरीचे युवा उद्योजक धम्मपाल उजगरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास मराठवाड्यातील वामनदादा कर्डक यांचे अनेक शिष्य प्रबोधनकार भीम गीतकार गायक लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिरा फाउंडेशनचे भगवानराव वाघमारे, भीमराव वाघमारे, भूषण मोरे,संजय बगाटे, यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात अनेक भीम गीतकारांनी वामनदादा कर्डक यांच्या जीवनावर आपले गीते सादर केले . त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news