परळी (प्रतिनिधी)लातूर येथील एमआयडीसी विभागात असणाऱ्या स्वामी विवेकानंद आश्रम शाळेत इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या बौद्ध विद्यार्थी अरविंद राजेभाऊ खोपे याचा मृत्यू झाला आहे .आपल्या मुलाचा घातपात झाल्याचा संशय पालकांना आहे. दरम्यान आपल्या मुलाचा घातपात झाल्याचे समजल्यानंतर विद्यार्थ्यांचे पालक व नातेवाईक लातूर येथील सदरील आश्रम शाळेत पोहोचले आहेत. अरविंद खोपे हा विद्यार्थी परळी तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, परळी तालुक्यातील पांगरी येथील मोल मजुरी करून खाणाऱ्या राजेभाऊ खोपे यांचा मुलगा अरविंद खोपे याला लातूर येथील स्वामी विवेकानंद आश्रम शाळेत शिकण्यासाठी ठेवले होते. दिनांक 29 जुलै रोजी अरविंद च्या आई-वडिलांना शिक्षकांनी अरविंद पळून गेला आहे असे सांगितले.
यानंतर तात्काळ रात्री अरविंद ची आई नातेवाईकांना घेऊन लातूर येथे पोहोचली. तेव्हा शिक्षकांनी त्यांना तुमचा अरविंद पळून गेला आहे असे सांगितले. त्यानंतर आश्रम शाळेत शोधाशोध केली असता आज अरविंद चा मृतदेह नातेवाईकांना सापडला. त्याच्या त्याच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या खुणा दिसत आहेत. त्याच्या मृतदेहाची गुपचूप विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न शिक्षकाकडून होत होता असेही पालकांचा आरोप आहे.
या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्हा तसेच लातूर जिल्हा शिक्षण क्षेत्रात हादरला असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधित संस्थाचालक व शिक्षकांना अटक करण्याची मागणी अरविंदच्या आई वडिलांनी व नातेवाईकांनी केले आहे. दरम्यान वृत्त लिहीपर्यंत अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता.या घटनेने आंबेडकरी समाजात संतापाची लाट उसळली आहे.