पाथरी(पाथरी) महाराष्ट्राचे कायदा सुव्यवस्था रोजगार महागाई शिक्षण आरोग्याच्या सर्वच पातळीवर सध्या घसरण झाली आहे यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा आज 17 ऑगस्ट रोजी पाथरी येथे येणार आहे. तरी पाथरी मतदार संघातील सर्व नागरिकांनी या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.
9 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावरून यात्रेला सुरुवात झाली असून ही शिवस्वराज्य यात्रा परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात आज 17 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता दाखल होणार आहे या यात्रेचे पाथरी नगरीत जंगी स्वागत करण्यात येणार आहे.यानंतर या यात्रेचे जिल्हा परिषद शाळा मैदान पाथरी येथे आयोजित सभेत होणार आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील,खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे,खासदार बजरंग सोनवणे,आमदार राजेश टोपे,जिल्हाध्यक्ष विजयराव गव्हाणे,माजी आमदार विजयराव भांबळे,सिताराम घनदाट मामा आदी मान्यवर नेते सहभागी होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मा.आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पुढे माहीती देत असताना सांगितलं की,राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासाळली आहे.बेरोजगारी वाढली आहे.अनेक ठीकाणी भ्रष्टाचार, गुंडगिरीने अक्षरशः थैमान घातले आहे.आपला पाथरी तालुका देखिल या गोष्टीला अपवाद राहीलेला नाही.यासह अनेक विषय जनजागृती करण्याच्या उद्देशाने निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेत असणार आहेत.अशी माहीती देत या शिवस्वराज्य यात्रेत पाथरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केले आहे.