परभणी, दि.04 (लक्ष्मण उजगरे) : जिल्ह्यात सलग दोन दिवस सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2024 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी ऑनलाईन पीकविमाची तक्रार दाखल करू शकले नाहीत, त्यांनी ऑफलाईन तक्रार किंवा नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
ज्या शेतक-यांना ऑनलाईन पूर्वसूचना देण्यासाठी पुरेसे ज्ञान नसल्यामुळे तसेच अँड्रॉईड मोबाईल फोन नसल्यामुळे अडचणी येत आहेत, अशा शेतक-यांच्या ऑफलाईन तक्रार घेण्याची कार्यवाही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.जिल्ह्यामध्ये दि. 1 सप्टेंबर रोजी 138.4 मि.मी पावसाची नोंद झाली असून पिकाचे मोठ्या प्रमाणात प्राथमिक नुकसान झाल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे. तसेच पाथरी महसूल मंडळात 314.5 मि.मी. इतक्या व काही महसूल मंडळात 200 मि.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील खरीपाचे जवळपास 80-90% क्षेत्र बाधित झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी आज बुधवारी (दि.04) पत्रान्वये शेतक-यांना ऑनलाईन पूर्वसूचना देण्यासाठी पुरेसे ज्ञान नसल्यामुळे तसेच अँड्रॉईड मोबाईल फोन नसल्यामुळे अडचणी येत आहेत, अशा शेतक-यांच्या ऑफलाईन तक्रारी नोंदवून घेण्याची कार्यवाही करण्याचे आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकाला सूचित केले असल्याचे सांगितले आहे.