Saturday, May 24, 2025

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

Spread the love

आज १ ऑगस्ट, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज १०४ वि जयंती. मराठी मातीत जन्मलेलं एक अनमोल रत्न म्हणजे अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शिधोजी साठे तर आईचे नाव वालुबाई. त्यांचे मूळ नाव तुकाराम असे होते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची व हलाखीची त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. अण्णाभाऊ केवळ दीड दिवस शाळेत गेले बाकीचे सर्व शिक्षण मुंबईच्या झोपडपट्टीत झाले. मुंबईत सुरवातीला त्यांनी मिळेल ती कामे केली नंतर त्यांना मुंबईतील गिरणीमध्ये झाडूवाल्याची नोकरी मिळाली. तिथेच त्यांना कामगारांच्या कष्टमय, दुःखमय जीवनाचे दर्शन झाले. कामगारांचे, संप, मोर्चे पाहून त्यांनी त्यांचा लढाऊपणाही अनुभवला. १९३६ साली कामगार नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते बनले. मुंबईत त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे ऐकली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी ते इतके प्रभावीत झाले की त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरू मानले. वडीलांच्या निधनानंतर घरची जबाबदारी त्यांच्यावर पडल्यानंतर ते पुन्हा गावी आले. तिथे बापू साठे या त्यांच्या चुलतभावाच्या तमाशा फडात ते काम करू लागले. १९४२ च्या आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांच्यावर पोलिसांनी पकड वारंट काढले. पोलिसांना चुकवत ते पुन्हा मुंबईला आले. मुंबईत आल्यावर लोकशाहीर म्हणून ते नावारूपास आले. १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने लाल बावटा या कलापथकाची त्यांनी स्थापना केली. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, लोकनाट्ये यांचा समावेश असे. महाराष्ट्राची परंपरा, मुंबई कोणाची? ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्ये खूप गाजली. अकलेची गोष्ट, देशभक्त घोटाळे, बेकायदेशीर, पुढारी मिळाला यासारखी त्यांनी लिहिलेली अनेक वगनाट्य लोकप्रिय झाली. अण्णाभाऊंच्या साहित्यात कथा कादंबरीची निर्मिती ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतुसे, आबी, खुलंवाडी, बरबाद्या कंजारी, चिरागनगरची भुते, कृष्णाकाठच्या कथा हे त्यांनी लिहिलेले कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. अण्णाभाऊंनी ३५ कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा, फकिरा, वारणेचा वाघ, माकडीचा माळ, रानगंगा, चिखलातील कमळ, वैजयंता या त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या खूप गाजल्या. फकिरा या त्यांच्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. फकिरा ही आजही सर्वाधिक विकली जाणारी कादंबरी आहे. अनेक विद्यापीठात या कादंबरीचा अभ्यासक्रमात समावेश आहे. जो व्यक्ती अवघे दीड दिवस शाळेत गेला त्या व्यक्तीची साहित्य संपदा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ठेवण्यात आली हा आधुनिक युगातील एक चमत्कार आहे. म्हणूनच अण्णाभाऊ हे आधुनिक युगातील साहित्यरत्न आहे. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले दलित आणि श्रमिक यांच्या समृद्धीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. जग बदल घालुनी घाव! सांगून गेले मज भीमराव! हे त्यांचे गीत खूप गाजले. माझी मैना गावाकडं राहिली… ही त्यांची लावणी तर अविस्मरणीय आहे. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे असे ते नेहमी म्हणत. मानवी जीवनातील संघर्ष, नाट्य, दुःख, दारिद्र्य त्यांच्या साहित्यातून प्रकट होते. जगातील सत्तावीस भाषांमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे. १९५७ साली झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध प्रसिद्ध केले गेले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ अण्णाभाऊ साठे अध्यासन सुरू करण्यात आले आहे. असा हा पदादलितांच्या जीवनावर वास्तव लिहिणारा साहित्यरत्न १८ जुलै १९६९ रोजी कालवश झाला. आज त्यांची १०४ वि जयंती त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

 

श्याम ठाणेदारदौं

ड जिल्हा पुणे९-९२२५४६२९५

- Advertisement -spot_img
Latest news
Related news