Saturday, April 5, 2025

स्पर्धा परीक्षा किंवा इतर खासगी कोचिंग क्लासेस मुळात हवेतच कशाला?

Spread the love

आपल्याकडे तरुणांचा देश म्हणून ओरड सुरू आहे मात्र , तोच तरुण सध्या कोणत्या अवस्थेतून जात आहे याचे मात्र कुणालाच काही देणे घेणे नाही. एकीकडे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांच्या वयाचा वाढत असलेला नंबर तर दुसरीकडे वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षा क्लासेसचे संचालक होतायत गब्बर . देश तरुण म्हणून आपण कुठपर्यंत घोकणार आहोत?की, त्यांच्यासाठी काही करणार आहोत? याचा कुठलाच आराखडा सरकारकडे दिसून येत नाही. विविध विभागात शेकडो जागा रिक्त असताना त्या न भरता खासगी पद्धतीने भरून तरुणांची चेष्टा केली जात आहे. नुकत्याच दिल्लीतील घटनेने क्लासेस सेंटरची विद्यार्थ्यांसाठी केलेली व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. अलीकडील घटनेने देशाच्या नोकरशाहीत आपले स्थान मिळविण्याच्या आशेने या परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांना सोसाव्या लागणाऱ्या आर्थिक आणि मानसिक त्रासांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अशा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी देशभरातून दूर-दूरवरून महानगरात येतात, तेथील निवासस्थानाच्या शोषणात्मक पद्धतीमुळे प्रचंड मानसिक दबाव विद्यार्थ्यांसाठी जगण्याचा खेळ बनतो आहे.या दबावाला बळी पडून महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या करून मरण पावले, त्याच्या काही दिवसांपूर्वीच एका कोचिंग सेंटरच्या पूरग्रस्त तळघरात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.दिल्लीतील मुसळधार पावसात त्यांच्या राजिंदर नगर कोचिंग सेंटरच्या पूरग्रस्त तळघरात अडकलेल्या तीन नागरी सेवा इच्छुकांच्या बुडून मृत्यू झाल्याची सर्वोच्च न्यायालयाला ५ ऑगस्ट रोजी स्वतःहून दखल घ्यावी लागली यावरून स्पर्धा परीक्षा क्लासेस तरुणांच्या जीवांशी किती खेळत आहेत याची प्रचिती येते.

स्पर्धा परीक्षा किंवा इतर खासगी कोचिंग क्लासेस मुळात हवेतच कशाला? असा प्रश्न पडला तर किंवा या प्रश्नाची कुणाला पुसटशी कल्पना सुध्दा नसेल की, क्लासेस शिवाय मुलं स्पर्धेत टिकतील याचीही कधी कल्पना केली नसेल. पण करून बघा.विचार केला तर गेल्या दहा- पंधरा वर्षांपूर्वी असे क्लासेस किती होते?तर होते हेच माहिती नसेल तेव्हा सुद्धा स्पर्धा परीक्षा होत्या आजही आहेत.पूर्वी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांची संख्या काही नगण्य असली तरी जागांची संख्या सुध्दा नगण्यच असायची. त्यामुळे यात काही किंचित तफावत असेल यात दुमत नाही.सध्याच्या घडीला स्पर्धा वाढली आहे हे कोणिही मान्य करेल पण स्पर्धा वाढली तशी जागाची संख्या सुध्दा वाढलेली दिसते तर अनेक क्षेत्रेही खुणावत आहेत.यात टिकायचे म्हणजे क्लासेस शिवाय टिकू शकत नाही.ही मानसिकता केवळ शहरांपुरती मर्यादित नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुध्दा स्पर्धा करायची म्हटलं तर खासगी क्लासेस शिवाय पर्याय नाही ही हल्ली मानसिकता निर्माण करण्यात स्पर्धा परीक्षा क्लासेस सेंटरचाही हातभार म्हणावा लागेल.कारण, काही स्पर्धा परीक्षा चालवणारे खासगी क्लासेस सेंटर आपल्या जाहिरातीत असे ठासवतात की, जणू त्या विद्यार्थ्यांची काहीच मेहनत नाही.सगळं काही त्या सेंटरची किमया.या जाहिराती वर्तमानपत्रांची पानच्या पानं भरून येतात.त्यामुळे या जाहिराती पाहून विद्यार्थ्यांचा क्लासेसकडे ओढा वाढतो आणि त्याशिवाय स्पर्धा परीक्षेत यश नाही अशी मानसिकता निर्माण होते हे सर्रास वास्तव चित्र आहे. मग, त्यातून आजच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षा चालवणाऱ्या खासगी क्लासेसमध्ये स्पर्धा लागली आहे. कोणत्या क्लासेसचे विद्यार्थी किती शासकीय पदांवर लागले?त्यातून क्लासेसचा व्यवसाय पाहिला तर ही सेवा की आर्थिक बाजार बनली आहे. एकीकडे दिवसेंदिवस क्लासेस सेंटरच्या माध्यमातून आर्थिक बाजार मांडला जातो तर दुसरीकडे मुलांसाठी पालकांचा आर्थिक बाजार उठतो. बरं यात शासकीय नौकरीला लागण्याचा टक्का किती तर अगदीच नगण्य. तर काही म्हणजे एखादं दुसरा विद्यार्थी कोणतेही क्लासेस न लावता यशस्वी होतो.जसे पंधरा -वीस वर्षांपूर्वी होते.मग, खासगी क्लासेस कशासाठी?हा प्रश्न पडतो.जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती काही तरी विशेष वेगळेपण घेऊन जन्म घेते.जो तो त्या -त्या परिने प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात.स्पर्धा परिक्षेत किंवा जीवनाच्या परिक्षेत. त्यामुळे अनेक जण आपापली वाट चोखळतात. कोणी स्पर्धा परीक्षांची तयारी करतो तर कोणी खासगी क्लासेस लावतो.त्या क्लासमधील काही मोजकेच विद्यार्थी यशस्वी होतात.तर इतरांची तितकी गुणवत्ता नसेल काय?हा प्रश्न. असे अनेक प्रश्न उपस्थित होतात म्हणून खासगी क्लासेस कशासाठी? क्लासेसचा हा गोरखधंदा गावपातळीपर्यंत येऊन ठेपलाय. त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. शहरात पावलापावलावर म्हटले तरी वावगे ठरू नये क्लासेस सेंटर आहेत.आजघडीला क्लासेस सम्राट लाखोंच्या चारचाकी गाड्यांमध्ये फिरतायत. ज्या शिक्षण क्षेत्रासाठी फुले दांपत्यानी जिवाची काड केली आणि इथल्या मातीत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.त्या शिक्षाणाचा बाजार खासगी क्लासेसवाल्यांनी रस्त्यावर आणाला आहे. सांगण्याचा मतलब म्हणजे दिल्लीतील एका क्लासेस सेंटरमध्ये पावसाचे पाणी शिरून दोन इच्छुक आयएएस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.या सगळ्या प्रश्नांचं उत्तरं एकच आहे.त्याने प्रश्न उपस्थित होतो की, खासगी क्लासेस सेंटर कशासाठी? स्पर्धा परीक्षा सेंटरपेक्षा शालेय, माध्यमिक , उच्च माध्यमिक तसेच पदवी स्तरावर स्पर्धा परीक्षांची प्राथमिक माहिती दिली तर पुढे स्पर्धा परीक्षा देताना त्या प्राथमिक माहितीच्या आधारे विद्यार्थी अभ्यास करून स्पर्धेत उतरतील.त्यामुळे स्पर्धा परीक्षा क्लासेस वेगळे लावण्याची गरज पडणार नाही.त्यामुळे त्यावर बंदी घातली तर आणि शालेय स्तरावर प्राथमिक माहिती दिली तर याचा विचार करावा एवढेच.

 

– पदमाकर उखळीकर,

मो.९९७५१८८९१२ .

- Advertisement -spot_img
Latest news
Related news