परभणी, ता.21
ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या माध्यमातून सहा लाख लोकांचे चार हजार कोटी रुपये हडप करणाऱ्या ज्ञानराधाचा संचालक सुरेश कुटे याच्यासह संचालकांवर परभणीच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आमदार डॉ.राहुल पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता तसेच शनिवारी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची भेट घेतली होती त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या आमिषाला बळी पडून राज्यभरात लाखो लोकांनी गुंतवणूक केली होती, परंतु लोकांना परतावा मिळाला नाही. यामुळे ज्ञानराधाच्या सर्व शाखा बंद झाल्या आहेत.संचालक सुरेश कुटे, अर्चना कुटे याच्यावर ठीक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु अजूनही लोकांच्या ठेवी परत मिळाल्या नाहीत तसेच कुठलीही कठोर कारवाई होत नसल्याने ठेवीदार तणावात आहेत, त्यामुळे तात्काळ संचालक कुटे याच्यावर कठोर कारवाई करून ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी कारवाई करावी अशी मागणी आमदार डॉ.पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात केली होती. तब्बल सहा लाख लोकांची चार हजार कोटी रुपये सुरेश कुटे याने कुठे नेऊन ठेवलेत, कोणत्या देशात ठेवले याचा शोध घ्यावा तसेच कोणत्या राजकीय नेत्यांना पैसे पुरवले याची देखील चौकशी करावी अशी मागणी आमदार डॉ पाटील यांनी केली होती.
सुरेश कुटे भाजपात जाताच त्याला अभय कसे मिळाले असा देखील प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला. परभणी जिल्ह्यात देखील हजारो लोकांचे लाखो रुपये सुरेश कुटे याच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटने हडप केले आहेत, त्यामुळे तात्काळ त्याच्यावर परभणीत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार पाटील यांनी शनिवार दिनांक 20 जुलै रोजी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची भेट घेऊन केली होती, त्यानंतर काही तासातच सुरेश कुटे याच्यासह 18 संचालकांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.