गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशी बातमी टीव्हीवर झळकली आणि संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली अर्थात ही बातमी पाहून केवळ महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली मात्र या बातमीने महाराष्ट्रात आनंदाचे भरते आले कारण बातमीच तशी होती. पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारताला तिसरे कांस्यपदक मिळाले आणि हे पदक मिळवून दिले ते महाराष्ट्राच्या मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे या नेमबाजाने. स्वप्नीलने नेमबाजीत ५० मीटर ३ पोझिशन नेमबाजी प्रकारात कांस्यपदक जिंकले. त्याच्या या पदकाची मंगळवारीच खात्री पटली होती कारण मंगळवारी झालेल्या क्वालिफायर राऊंड मध्ये त्याने ५९० गुण मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने क्वालिफायर राऊंड मध्ये गुडघे १९८, प्रोन १९७ आणि उभे राहून १९५ गुण मिळवले. त्याचा हा फॉर्म पाहून सर्वांनाच खात्री पटली होती की तो यावेळी तो इतिहास घडवेल आणि गुरुवारी त्याने सर्वांचा विश्वास सार्थ ठरवत इतिहास घडवला आणि कांस्य पदकावर स्वतःचे नाव कोरले. भारताचे हे या ऑलिंपिक मधील तिसरे पदक ठरले. याआधी मनू भाकर ने व्यक्तिगत आणि सरबज्योत सोबत मिक्स नेमबाजी प्रकारात कांस्यपदक मिळवले. महाराष्ट्रासाठी तर हे पदक विशेष आहे कारण महाराष्ट्राने ऑलिंपिकमध्ये मिळवलेले हे केवळ दुसरेच पदक आहे. याआधी १९५२ साली झालेल्या हेलसिंकी ऑलिंपिक मध्ये कोल्हापूरचा मल्ल खाशाबा जाधव याने कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते त्यानंतर आता थेट ७२ वर्षानंतर कोल्हापूरच्याच स्वप्नीलने अशी कामगिरी करून इतिहास रचला. ७२ वर्षापासून महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होता. त्याची ही कामगिरी जितकी अभिमानास्पद आहे तितकीच ती प्रेरणादायी आहे. ६ ऑगस्ट १९९५ रोजी जन्मलेला स्वप्नील हा तुमच्या आमच्या सारखाच मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील. त्याचे वडील सुरेश कुसाळे हे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या छोट्याश्या गावात त्याचा जन्म झाला. पहिली ते चौथी पर्यंतचे त्याचे प्राथमिक शिक्षण याच गावात झाले. तर सातवी पर्यंतचे शिक्षण कोल्हापूरला झाले. सातवीत असतानाच त्याची क्रिडा प्रबोधनी साठी निवड झाली. आठवीत असताना त्याने नेमबाजी या क्रीडा प्रकारासाठी रायफलची निवड केली नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमधून प्रशिक्षण घेतले. २००८ हे साल त्याच्या जीवनाला कलाटणी देणारे साल ठरले कारण याच वर्षी भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले. अभिनवची मॅच पाहण्यासाठी त्याने बारावीचा पेपर बुडवला होता. अभिनव बिंद्राला देशासाठी सुवर्णपदक जिंकताना पाहिल्यावर त्याने निश्चय केला की आपणही अभिनव प्रमाणेच देशासाठी ऑलिंपिकमध्ये पदक जिंकायचे. त्याने केवळ निश्चय केला नाही तर त्यासाठी त्याने दिवसाची रात्र केली. त्याने ढोर मेहनत केली. नेमबाजीचा तासंतास सराव केला. या मेहनतीला अखेर गुरुवारी फळ मिळाले आणि त्याने इतिहास रचला. भारताचा तिरंगा त्याने क्रीडा नगरीत डौलाने फडकवला आणि १४० कोटी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. त्याच्या या कामगिरीने देशाची आणि महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. स्वप्नील हा रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. महेंद्रसिंग धोनी हा त्याचा आदर्श महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्वाने तो प्रभावित झाला. महेंद्रसिंग धोनीकडून त्याने प्रेरणा घेतली. आता त्याची कामगिरी पाहून अनेक तरुण मुले त्याच्याकडून प्रेरणा घेतील आणि भविष्यात स्वप्नील प्रमाणेच देशासाठी ऐतिहासिक कामगिरी करतील. ऑलिंपिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेचे मनापासून अभिनंदन आणि त्याला त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५