पाथरी (लक्ष्मण उजगरे) पाथरी तालुक्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करत असताना परभणी एलसीबीच्या पथकाला आढळून आले.त्यांनी त्या टिप्पर पाठलाग करत टीप्परसह दोन आरोपींना ताब्यात घेवुन पुढील कारवाईसाठी पाथरी पोलीसांच्या स्वाधीन केले.
सविस्तर बातमी अशी की पाथरी तालुक्यामध्ये गोदावरी नदीची पात्र मोठे असल्याने पाथरी तालुका हा नेहमीच अवैध वाळू उपस्यासाठी व वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे. कारण मागील काळात महसूल अधिकारी व तत्कालीन पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांच्या वरदहस्तामुळे पाथरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळी अवैध वाळूची वाहतूक करण्यात येत होती.परंतु त्यांची बदली झाल्यानंतर कुठेतरी रात्रीचा खेळ नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक मंडलवार यांच्या काळात तरी बंद होईल अशी चर्चा पाथरीत होती परंतु मधल्या काळात पाऊस पडल्याने काही दिवस हा वाळू उपसा व वाहतूक बंद राहीली. परंतु मागील आठवड्याभरात पावसाने उघड दिल्याने तालुक्यातील काही गावांमध्ये असलेले वाळूसाठे वाळू माफियांनी अवैधरित्या वाहतूक करण्यास सुरुवात केली. दिनांक 21 सप्टेंबर रोजी पहाटे पाच-सहा वाजेच्या दरम्यान एलसीबीचे पथक गस्तीवर असताना त्यांना माळीवाडा परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर दिसले. पथकाने त्याचा पाठलाग करत आवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर सहित दोन आरोपींनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 487/ 2024 कलम श 303 (2) भारतीय न्याय संहिता अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमध्ये एलसीबी चे पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, पो.हे.का.विलास सातपुते, पो.हे.का विष्णू चव्हाण,पो. शि.मधुकर ढवळे,म.पो.शि.पवार,चा.पो.ना संजय घुगे आदींचा समावेश होता. पथकाने पकडलेल्या टिप्पर व वाळूची अंदाजे 515000 असा मुद्देमाल व दोन आरोपीसह पाथरी पोलिसांच्या ताब्यात दिला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कापुरे हे करत आहेत.
गौडगाव येथे केनीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू
मागील काही काळात पाथरी तालुक्यात पाऊस झाल्याने वाळूचा उपसा बंद झाला होता.परंतु मागील आठवड्यात पावसाने उघड दिल्याने तालुक्यातील गौडगाव येथिल रेणुका माता मंदिर जवळ असलेल्या गोदावरी पात्रामध्ये केणीच्या साह्याने तेथील वाळू माफिया कडून वाळू उपसा सुरू असून याकडे संबंधित सज्जाचे तलाठी व मंडळाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची दुर्लक्ष केले जात आहे.
पाथरी पोलिसांकडून रात्रीच्या वेळी चालणाऱ्या अवैध वाहनांवर कारवाई होईल का?
उन्हाळ्यामध्ये पाथरी तालुक्याती गोदावरी नदीचे पात्र कोरडे असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर पाथरी तालुक्यातील पाटोदा, मर्डसगाव,गुंज,डाकूपिंपरी,उमरा,गौडगाव,मसला इत्यादी ठिकाणी मोठे-मोठे साठे करून रात्रीच्या वेळी आवैध वाहतूक करत पाथरी शहरासह मानवत तालुक्यामध्ये वाहतूक करण्यात येत होती परंतु तत्कालीन पोलीस निरीक्षक मोहिते यांच्या आशीर्वादाने पाथरी तालुक्यातील हादगाव-पाथरी रोड,ढालेगाव-पाथरी रोड, सोनपेठ-पाथरी रोड खुलेआम पणे अवैध वाळूची वाहतूक होत असताना त्यांच्याकडून नावालाच कारवाया केल्या जात होत्या. त्यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक मंडलवार यांच्याही काळात अवैध वाळू वाहतूक होत असताना परभणीच्या एलसीबी पथकाकडून कारवाई होते तर पाथरी पोलिसांकडून का होत नाही याची देखील चर्चा होऊ लागली आहे. यापुढे तरी नव्याने रुजु झालेले पोलीस निरीक्षक मंडलवार या सर्व प्रकाराकडे स्वतः लक्ष देऊन येणाऱ्या काळात रात्रीच्या वेळी होणारी अवैध वाळू वाहतूक बंद करतील का याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.