Saturday, April 5, 2025

*विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण संपन्न* *निवडणूक काळात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वय व दक्षतेने कामे करावीत- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे*

Spread the love

परभणी, दि. 26 (लक्ष्मण उजगरे) : आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून प्रभावीपणे पूर्वतयारी सुरू आहे. त्याअंतर्गत विविध बाबींच्या प्रशिक्षण सत्रांना सुरूवात झाली आहे. या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बुधवार व गुरूवारी दोन दिवसांचे प्रशिक्षण सत्र जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. विधानसभा निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेली जबाबदारी समन्वय व दक्षतेने पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्याची सूचना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात प्रशिक्षण सत्रांना प्रारंभ झाला आहे. या प्रशिक्षण सत्र प्रसंगी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी आणि सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

दोन दिवसीय प्रशिक्षण सत्रामध्ये निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्याशी संबंधित प्रत्येक बाबींचे प्रशिक्षण अधिकारी व कर्मचा-यांना देण्यात आले. प्रथम दिवशी निवडणूक प्रक्रिया (अधिसूचना ते निवडणूक निकाल घोषणा) तसेच कायदा व सुव्यवस्था आणि आचारसंहिता व विविध विभागतील समन्वय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी खर्च अभिलेखे आणि निवडणूक विषयक अन्य बाबींचे सादरीकरणाव्दारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नामनिर्देशन, छाननी, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया, चिन्हवाटप, मतदान पथक, मतदान केंद्रे, मतमोजणी, पोस्टल बॅलेट, आयटी ॲप्लिकेशन्स याबाबतही तज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी म्हणाले की, निवडणूक कामकाजात कुठलीही चूक करु नये. निवडणूकशी संबंधित सर्व माहिती जाणून घ्यावी. प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावे, याबाबत दक्ष राहावे. स्वीप कार्यक्रमातंर्गत मतदानाविषयी जनजागृती करावी

.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news