येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात होत असलेल्या गौणखनिज उत्खननाबाबत चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी जय किसान आंदोलन स्वराज इंडिया परभणीचे जिल्हाध्यक्ष गोविंद उत्तमराव गिरी यांनी राज्यपालांकडें केलेली आहे. त्याअनुषंगाने अर्जात नमुद केलेल्या बाबीनुसार स्थळपाहणी चौकशी करुन केलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदार गिरी यांना अवगत करुन अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिनांक 27 फेब्रुवारीच्या पत्राद्वारे तहसीलदार व विद्यापीठ अभियंता दिले आहेत.
याबाबत जय किसान आंदोलन स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव गिरी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती यांना जिल्हाधिकार्यांमार्फत निवेदन दिले होते. त्यात म्हटले होते की, परभणी येथील कृषि विद्यापीठात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गौणखनिज उत्खनन चालू आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात असलेले वन्यजीव, प्राणी-पक्षी यांच्या नैसर्गिक अधिवासात मोठे बदल घडत येत असून, त्याचा प्रतिकूल परिणाम इथल्या वन्य जीवावर देखील होणार आहे. शिवाय पाण्याचे स्त्रोत यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल घडून येऊ शकतो.
विद्यापीठाचा मूळ उद्देश शिक्षण शेती, संशोधन व शेतकर्यांच्या समृद्धीचा असून अनेक गावच्या शेतकर्यांनी आपल्या जमीन ह्यासाठी विद्यापीठाला दिल्या .परंतु विद्यापीठात अशा पद्धतीने गौण खनिज उत्खनन होत आहे ही अत्यंत खेदनजनक बाब आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासन कुठल्या आधारे हे करत आहे हा प्रश्न पडतो. तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशी करावी व दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गोविंद गिरी यांनी केली. तसेच निवेदनाच्या प्रती राष्ट्रीय हरित लवाद पुणे, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी परभणी, वनामकृवीचे कुलगुरू, पोलीस अधीक्षक परभणी, नवा मोंढा ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या होत्या. याची दखल घेत जिल्हाधिकारी गावडे यांनी परभणीचे तहसीलदार व विद्यापीठ अभियंता यांना दि.27 फेब्रुवारीला पत्राद्वारे आदेश दिले आहेत.
अर्जदार श्री. गोविंद गिरी यांनी दि.3 फेब्रुवारी रोजी अर्ज करुन मागील काही महिन्यांपासुन व.ना.म.कृ.वि. परभणी येथील शेंद्रा रोड लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन होत आहे व तेथुन टिप्पर हायवा द्वारे अवैध वाहतुक होत आहे, अशी तक्रार केलेली आहे. या प्रकरणी वस्तुनिष्ठ पंचनामा करत कायदेशीर कारवाई करणे अन्यथा या प्रकरणी आंदोलन करण्यात येईल असे अर्जात नमुद केले आहे. त्यामुळे अर्जात नमुद केलेल्या बाबीनुसार स्थळपाहणी चौकशी करुन केलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदार गिरी यांना अवगत करुन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा, असेही पत्रात नमूद आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना गोविंद गिरी यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाकडून अत्यंत संथगतीने ही चौकशी प्रक्रिया चालू आहे. विद्यापीठातील अवैध व मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गौण खनिज उत्खननाबाबत तहसीलदारांनी तातडीने अहवाल सादर केला नाही तर 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विद्यापीठातील टोपलेभर अवैध गौण खनिज आणून त्याचा ढिग करत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.