पाथरी(लक्ष्मण उजगरे)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) पाथरी आगाराला आजपासून १४ नवीन एसटी बसेस मिळाल्या असून या बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते बुधवार 28 मे रोजी दुपारी दोन वाजता पाथरी आगार प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दादासाहेब टेंगसे, मानवतचे माजी नगराध्यक्ष अंकुश लाड, मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, आगार प्रमुख हनुमंत चपटे, बाजार समितीचे माजी सभापती माधवराव जोगदंड, संजय रनेर, बाळासाहेब कोल्हे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेश ढगे, बाजार समितीचे संचालक रामप्रसाद कोल्हे, अजिंक्य नखाते, संतोष कोल्हे, विष्णुपंत घांडगे, विठ्ठल घांडगे, राजेभाऊ लिपणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाथरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, एसटी महामंडळाचे कर्मचारी, चालक, वाहक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आगार प्रमुख हनुमंत चपटे यांनी केले. त्यांनी सांगितले की, “नवीन १४ बसेस मिळाल्यामुळे पाथरी आगारातील एकूण बसांची संख्या आता ७४ झाली असून दररोज सुमारे २५ हजार किलोमीटरचा प्रवास केला जात आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सेवा देता येणार आहे.”
यावेळी प्राथमिक स्वरूपामध्ये आगारातील वाहक चालकांचा रुमाल , टोपी घालत सत्कार करण्यात आला . नवीन गाड्या कोल्हापूर ,अकोला , छत्रपती संभाजीनगर ,शिर्डी व नाशिक या ठिकाणी लांब पडल्याचा प्रवासासाठी सुरू करणार येणार असल्याचेही सांगण्यात आले .
“पाथरी आगारामध्ये नवीन बसेस मिळाव्यात ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्यामुळे ही मागणी पूर्ण झाली. नवीन १४ बसेसमुळे पाथरी आगार आणखी चांगली सेवा देईल. यातील पाच लालपरी आणि नऊ बस मानव विकास मिशन अंतर्गत देण्यात आल्या आहेत. भविष्यात आणखी २५ हजार नवीन बस खरेदी करण्यात येणार असून, त्यातील काही बसेस पाथरीसाठी मिळवण्याचा माझा प्रयत्न असेल.”- आमदार राजेश विटेकर*